राज्याच्या २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल होणार !
राज्याच्या २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल होणार !
मुंबई, दि. २९ जुलै
कोरोनाच्या निर्बंधाला कंटाळलेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. हे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. हे लक्षात घेता राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत तसा प्रस्ताव देण्यात आला असून एक दोन दिवसात तसा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल. निर्बंध हटवण्यात आलेल्या २५ जिल्ह्यांव्यतिरिक्त उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.
ज्या २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, त्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, खासगी कार्यालयांच्या वेळा अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आणि फक्त रविवारी बंद. खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकतात.थिएटर्स, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते. असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
