कागदपत्रे नाहीत गृहीत धरून पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी.
कागदपत्रे नाहीत हे गृहीत धरून पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी.
पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा करू.
रत्नागिरी, दि 25 जुलै :
पुराने कोकणातील प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण बाजारपेठेतील स्थिती तर भयावह आहे. काहीच शिल्लक राहिलेले नाही. या सर्वांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत द्यायला हवी. या नागरिकांचे कागदपत्र सुद्धा पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे कागदपत्र नाहीत, हे गृहित धरून ही मदत करावी लागेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आज कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावांत झालेले नुकसान सुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत.
कोल्हापूर-सांगलीच्या पुराच्या वेळी थेट रोखीने मदत आपण दिली होती. नवीन घरे बांधून होत नाहीत, तोवर भाडे सुद्धा दिले होते. तशीच मदत व्हावी. तातडीच्या मदतीत निकषांचा विचार करायचा नसतो.निकषांनुसार भरीव मदत पुढच्या काळात होत राहील. अंगावर घालायला कपडे सुद्धा नागरिकांकडे नाहीत. सारेच वाहून गेले आहे. तीन ठिकाणी कम्युनिटी किचन भाजपाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत.
वर्षभरात कोकणात ज्या घटना घडल्या आहेत, त्या पाहता थोडा वेगळा विचार येणार्या काळात करावा लागेल. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नव्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील आणि यादृष्टीने ‘रोडमॅप’ तयार करण्याची नितांत गरज आहे.
पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना तातडीने मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची वेळ आहे. भारतीय जनता पार्टी सुद्धा शक्य ती सर्व तातडीची मदत या नागरिकांपर्यंत पोहोचवित आहे.
अलमट्टीचा विसर्ग सुरू होतो, तेव्हा कर्नाटकात पूर येतो. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच अतिरिक्त विसर्ग केला तर बरे होईल, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
