राज्यात अतिवृष्टी व दरड दुर्घटनेत ७६ मृत्यू !
राज्यात अतिवृष्टी व दरड दुर्घटनेत ७६ मृत्यू !
मुंबई, दि. २४ जुलै:
अतिवृष्टी व दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत राज्यात आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५९ लोक बेपत्ता आहेत. अतिवृष्टीनंतर घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीने तडाखा दिला आहे. एनडीआरएफसह लष्कर, नौदल, हवाई दलानंही मदत व बचावकार्यात झोकून दिले आहे. लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात असून ९० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
महाड तालुक्यातील तळीयेत दरड कोसळून तब्बल ३२ घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. या दुर्घटनेत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. ५२ जण बेपत्ता असून बेपत्ता झालेल्यांमध्ये ३५ महिला व १० मुलांचा समावेश आहेत. तसेच दहा वर्षाखालील दोन मुलंही या दुर्घटनेत बेपत्ता आहेत. एनडीआरएफच्या तीन पथकांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. तसंच बेपत्ता ग्रामस्थांचाही शोध घेतला जात आहे. अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वरंध घाट परिसरातील तळये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरं दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आंबेघर व मोरणा इथे दरडी कोसळून १६ जण बेपत्ता झाले आहेत. काही ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं सर्वत्र हाहाकार उडाला आहे. जीवितहानीबरोबरच मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालं आहे.
एनडीआरएफची २१, संरक्षण दलांची १४ आणि एसडीआरएफची चार पथके पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत. एनडीआरएफच्या ४८ आणि एसडीआरएफच्या ११ बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या लोकांच्या अन्नपाण्याची सोय केली जात आहे.
