चलनी नोटा व अर्थव्यवस्थेला धार्मिक रंग देण्याचा केजरीवालांचा प्रयत्न

0
IMG-20221002-WA0056

चलनी नोटा व अर्थव्यवस्थेला धार्मिक रंग देण्याचा केजरीवालांचा प्रयत्न..

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून ते मोदींच्या मदतीला धावलेत. बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा हा प्रयत्न आहे. केजरीवालांच्या चेह-यावरील बुरखा फाटला असून त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि गलथानपणामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. दिवसेंदिवस रुपयाचे अवमुल्यन होत आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. जनता निराश असून देशात सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. अर्थव्यवस्थेला रूळावर आणून लोकांना दिलासा देण्यासाठी अर्थतज्ञ या क्षेत्रातले जाणकार विविध सल्ले देत आहेत. पण देशाच्या अर्थमंत्री रूपयांची घसरण होत नाही तर डॉलर मजबूत झाला आहे असे सांगून क्रूर थट्टा करत आहेत.

दिल्लीचे उच्चशिक्षीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्मला सितारामन यांच्या पुढे एक पाऊल टाकत रूपयांची घसरण रोखण्यासाठी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी केजरीवाल आता चलनी नोटा आणि अर्थव्यवस्थेला धार्मिक रंग देत आहेत.  केजरीवाल यांना या संदर्भातील कायदे आणि नियम माहित असूनही अशी मागणी करून ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी तर त्यापुढे जाऊन नोटांवर मोदींचा फोटे छापण्याची मागणी केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत राज्यातील या नेत्यांची बुद्धी ही दिवाळखोरीत निघाली आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *